जुन्नर.. प्राचीन लेण्यांच शहर अभ्यासण्यासाठी परदेशी पर्यटकांची पहिली पसंती.

जुन्नर सातवाहन कालीन ऐतिहासिक शहर. जुन्नरचा पूर्वी जिर्णनगर असाही उल्लेख आढळून येतो. ऐतिहासिक प्राचीन बाजारपेठ आणि प्राचीन लेण्यांच शहर म्हणून या शहराची ओळख निर्माण झाली कारण याच शहराच्या बाजूला असलेल्या उत्तुंग आणि नैसर्गिक साधनसंपत्तीनं नटलेला सह्याद्री. ऐतिहासिक गड किल्ले याच ऐतिहासिक गड किल्यांच्या कुशीत आणि सह्याद्रीच्या काळ्या कातळात नऊ गटामध्ये कोरलेल्या जवळ जवळ साडे चारशे लेण्यांचा अनमोल ऐतिहासिक प्राचीन खजिनाच म्हणावा लागेल. शिवनेरी, मानमोडी, कपिचीत (लेण्याद्री), अंबा अंबिका, सुलेमान यासारख्या लेण्यांचा समूह बुध्दांच्या समतेच्या विचारांची आजही साक्ष देतो. कधीकाळी विस्मृतित गेलेला इतिहास आणि त्याची पाळेमुळे किती खोलवर आणि घट्ट रुजली आहेत याची साक्ष देतो. इथला प्रत्येक शिलालेख आर्थिक समृद्धीची साक्ष देतो. इथल्या प्रत्येक शिल्पामध्ये तत्कालीन सामाजिक समता आणि समाजजीवन जिव ओतून बंदिस्त करणारा तो अनामिक शिल्पकार तत्कालीन कलेचा सर्वोच्च अविष्कार साकारणारा प्रगल्भ समाजाचा प्रतिनिधी वाटतो.

जुन्नर तालुक्यातील बहुसंख्य लेण्या ह्या बुध्द संस्कृतीचा प्रगल्भ इतिहास आणि धम्माशी संबधित असल्यामुळे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहेत. आजपर्यंत या लेण्यांवरती पर्यटकांना कोणत्याही प्रकारची आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी सरकारी यंत्रणा अनुकूल ठरलेली नाही. याच प्रमुख कारण म्हणजे बुध्दांनी अंधश्रद्धा आणि ब्राम्हणी धर्मपरंपरेला केलेला कडाडून विरोध. याच कारणामुळे लोकप्रतिनिधी सुध्दा “लेण्या बघण्यासाठी कोणी कुत्र सुध्दा येत नाही ” अशाप्रकारची समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची वक्तव्य करताना दिसतात. आज कोणत्याही सोयी सुविधा नसताना बुध्दांच्या विचारांशी जवळीक असलेले अनेक देशी परदेशी पर्यटक, अभ्यासक जुन्नर विभागातील लेण्यांना भेट देतात. कालच चीन व भारत या दोन देशांमधील प्राचीन संबंध कशा पद्धतीने साधला जायचा या विषयावर शोधप्रबंध लिहिण्यासाठी अभ्यासक प्रोफेसर लिंग ली हे शिवनेरी आणि मानमोडी गटातील लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी आले होते. असे कित्येक अभ्यासक येतात त्यांना या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या लेण्यांचा अभ्यास आजही करावा असे का वाटत असावे? याचे भान निदान लोकप्रतिनिधी म्हणून समाजामध्ये वावरलेल्या लोकांनी करायला हवा.

सातवाहन कालीन व्यापारी बाजारपेठ असलेले जुन्नर शहर हे नाणेघाट या व्यापारी मार्गाद्वारे कोकणातील सोपारा आणि प्रमुख व्यापारी बंदरांना जोडलेले असल्यामुळे तत्कालीन व्यापार हा जगातील प्रमुख देशांशी होत होता. त्यामुळे हे शहर ऐतिहासिक दृष्ट्या किती महत्त्वाचे आहे हे समजते. आजही जुन्नर शहरालगतच्या भागात प्राचीन नाणी, ऐतिहासिक वस्तू सापडतात आणि या ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करून त्या वस्तू जतन करण्यासाठी बापूजी ताम्हाणे समाजामध्ये एक आदर्श ठरतात. त्यांच्याकडे असलेल्या या ऐतिहासिक वस्तू इतिहास अभ्यासकांना आकर्षित करतात. चीन मधून आलेल्या या बांधवांना ABCPR (प्राचीन बुध्दलेणी संवर्धन आणि संशोधन) या टीमचे पुणे जिल्हा लेणीसंवर्धक मकरंद लंकेश्वर यांनी जुन्नर मधील शिवनेरी आणि मानमोडी लेण्यांची माहिती देऊन हा गौरवशाली परंपरा असणारा इतिहास परदेशी लोकांच्या समोर ठेवला.

जेव्हा आमच्या प्रतिनिधीने लिंग ली आणि त्यांच्यासोबत आलेल्या इतर पर्यटकांना या ऐतिहासिक लेण्यांविषयी मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही ऐतिहासिक प्राचीन विरासत बघून तिथले बुध्दाचे प्रतिक असलेले स्तूप, शिल्पकला, शिलालेख बघून त्यांची बुध्दाविषयी असलेली कृतज्ञता आणि आदर अजून द्विगुणीत झाला. परंतु एकीकडे हे अभ्यासत असताना बुध्दाच्याच देशामध्ये जेव्हा बुध्दाची हेटाळणी केली जाते. त्याला विकृत करून संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. हे सुध्दा त्यांच्या नजरेतून सुटले नाही. कारण बुध्दाच्या प्रतिकांना विकृत केल जात आहे. बुध्दाच्या समतेच्या विचारसरणीवर ज्या लेण्यांची निर्मिती झाली त्या लेण्यांवरती आज अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. हे पाहून ते खूप दुःखी झाले आणि आपले दुःख त्यांनी स्पष्ट शब्दात व्यक्त केले. जर असच चालत राहिले तर बुध्द या देशातून नाहीसा होइल. पूर्वीपासूनच बुध्दाला दडपण्याचा प्रयत्न ही सनातनी व्यवस्था करत असताना या भूमीत घट्ट रोवलेली बुध्द धम्माची खोलवर रुजली गेलेली पाळंमुळं उखडून टाकण्यासाठी या देशातील लोकप्रतिनिधी लेण्यांमध्ये अतिक्रमणासाठी फूस देतात आणि हा प्राचीन वारसा नष्ट करण्यासाठी मदत करतात. जेव्हा परदेशी अभ्यासकांना या गोष्टींची कल्पना दिली तेव्हा बुध्द त्यांच्याच देशात दडपला जातोय या कल्पनेने या पर्यटकांना दुःख होते त्यांच्या डोक्यात पाणी येते. त्यामुळे हा ऐतिहासिक वारसा जपण्याची जबाबदारी खूप मोठी आहे. ABCPR (Ancient Buddhist Caves Preaservation and Research) प्राचीन बुध्दलेणी संवर्धन आणि संशोधन ही टीम नेहमीच हा वारसा जनमानसात घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करेल.

Team_ABCPR

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat