चक्रवर्ती सम्राट अशोकाची यशोगाथा भाग :६

सम्राट अशोकाच्या राज्यव्यवस्थेचा विचार केला तर या गोष्टीची नक्कीच जाणीव होइल की एका राजाला सम्राट, प्रियदर्शी किंवा चक्रवर्ती अशी संबोधने का लावली असतील. सम्राट अशोकाच्या साम्राज्यातील जे प्रदेश राजकीय दृष्ट्या महत्वाचे आहेत, जसे उज्जैन, तोसली आणि सुवर्णगिरी या प्रातांचा राज्यकारभार आपल्या राजपुत्राकडे सोपवला होता. सम्राट अशोकाने गादीवर बसण्यासाठी आपल्या सर्व भावांना ठार केले. इतिहासकारांनी आणि पुराणांनी असा अनेक ग्रंथांमधून चुकीचा प्रचार केलेला आहे. स्तंभलेख पाचवर उल्लेख केला आहे की, पाटलीपुत्र व इतर शहरांमध्ये त्यांचे भाऊ बहीण आणि इतर नातेवाईकांना स्वतंत्र घर किंवा खोल्यांची व्यवस्था निर्माण केली होती याचा अर्थ त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्य व नातेवाईक जिवंत आणि सुरक्षित होते.

सम्राट अशोकाने आपला राज्यकारभार सुरळीत चालावा यासाठी गव्हर्नराची नेमणूक केली होती त्याच्यामर्फत प्रांतातील सोई सुविधा आणि देखरेख करण्यासाठी काही उच्चपदावरील अधिकारी नेमले होते. त्यांनाच प्रादेशिक असे म्हणत. प्रत्येक प्रांतातील जिल्ह्यात असे महामात्र नेमले जात. महामात्र परिषद किंवा मंत्रीमंडळाची स्थापना केली होती. अशा प्रकारची कार्यपद्धती सम्राट अशोकाला महाबलाढ्य किंवा महान नैतिक राजा म्हणून ओळख निर्माण करून देते. कोसंबी येथील लेखात तसेच पाटलीपुत्र आणि राणीच्या लेखात कोसंबीच्या महामात्रास, सारनाथ येथील लेखात त्या प्रांतातील महामात्रांना आदेश देण्यात आले आहेत. धौली व समापा येथील महामात्रांना न्यायदानाचे अधिकार देण्यात आले आहेत. याशिवाय सीमेवर असणार्‍या राष्ट्रांवर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आपल्या राज्यभिषेकाच्या तेराव्या वर्षी धर्ममहामात्र नेमले होते. त्या धर्महामात्रांची जबाबदारी लोकांमध्ये नीतिमत्ता वाढीस लागावी यासाठी काम करावे लागत होते.
समाजातील महत्वाचा घटक म्हणजे स्त्रिया! त्यांच्या कल्याणासाठी किंवा स्त्रियांना सक्षम बनवण्यासाठी ज्या योजना राबविण्यात येत असत त्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्त्री अध्यक्ष महामात्र यांची नियुक्ती करण्यात आली होती.

दुसरा अधिकारी वर्ग म्हणजे राजुक किंवा लाजुक होता. त्याचे कार्यक्षेत्र म्हणजे काही लाख लोकसंख्येवरती त्यांची नियुक्ती होती. चांगल्या सज्जन लोकांना शासकीय बक्षिसे आणि दुर्जनांना शिक्षा किंवा दंड देण्याचा त्यांना अधिकार होते. रज्जूवाहक म्हणजे दोर धरणारा म्हणजे याचे काम जमिन मोजणे, तळ्यातील किंवा सरोवरातील पाणी वाटप करणे, तसेच गावातील प्रत्येक क्षेत्रातील कारागिरांकडून कर वसूल करणे इत्यादी कामे होती. आधुनिक पटवार्यास त्यावेळी रज्जूक म्हणत याशिवाय सेक्रेटरी म्हणून काम करणारा युतस किंवा युक्तस म्हणून ओळखले जात. तो महामात्रांना कार्यालयात मदत करत होता. युत हे प्रांताचे अधिकारी होते. या अधिकाऱ्यांना राजकार्याशिवाय धर्मप्रसार करण्यासाठी आपल्या जनपद क्षेत्रात दौरे करावे लागत.

आजच्या विदेश मंत्रालयाच्या कार्यालयासारखे त्यावेळी कार्यालय होते. राजाचा दूत वकील म्हणून सम्राट अशोकाने शेजारच्या पांड्य, चोल, सिलोन आणि इतर पाच ग्रीक देशात आपले वकील नेमले होते. सम्राट अशोकाच्या दरबारात डियोनिसीयस हा आॅलेमी द्वितीय फिलाडेल्फस हा इजिप्तचा वकील होता. विदेशनीती सह अस्तित्व आणि शांती यावर आधारित होती. चंद्रगुप्तापासून सम्राट अशोक पर्यंत साम्राज्याची विदेश निती मैत्रीपूर्ण होती. सिरियाच्या राजाशी सम्राट अशोकाच्या वडिलांचा बिंदुसार राजाचा पत्रव्यवहार होता. सम्राट अशोकाने धर्मविजय आणि धर्मप्रचाराकरिता अन्तियोक, इजिप्तचा राजा तुरमाय राजाशी मैत्रीचे संबंध होते. विश्वशांतीसाठी म्हणजेच सर्व मानवजात व पशुपक्षी सुखी रहावेत यासाठी सदैव प्रयत्नशील असावे. याच उद्देशाने प्रेरीत होऊन सिमेलरील शेजारच्या राष्ट्रांना आपली निती प्रतिपादित केली. ” आपण घाबरु नका, भितीचे कारण नाही. अगदी निश्चिंतपणे रहा. माझ्याकडून सुख शांती प्राप्त करा. दुःखी होऊ नका. ” धौली लेखात स्पष्ट आदेश दिले आहेत. असे लिखित अभिवचन दिले आहे. सम्राट अशोक मनुष्य कल्याणासाठी झटत होते. त्यांच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील सदैव मनुष्य आणि प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी झटावे असे आदेश दिले होते. पशुपक्षांच्या कल्याणासाठी त्यांनी व्रजभूमीक नावाचे अधिकारी नियुक्त केले होते. त्यांनी साम्राज्यातील पशुपक्षांच्या सुखशांती साठी औषधालय स्थापन करून औषधी गुणयुक्त झाडांची लागवड करावी. विहीरी आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्याऊ, प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हौद, विश्रांमगृह सावलीसाठी रस्त्याशेजारी झाडांची लागवड करावी व त्यांची देखरेख करावी असे आदेश दिले होते. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यामुळेच विश्वकल्याण व शांती स्थापित होऊ शकेल यावर सम्राट अशोकाची श्रध्दा होती.

विश्वशांतीसाठी प्रयत्न करत असताना साम्राज्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी शस्त्रांचा वापर अजिबात टाळला नाही. आपली सैनिकी शक्ती पुर्वी होती तीच पुढेही कायम ठेवली. त्यांच्या संरक्षण व्यवस्थेविषयी आपणांस कळून येईल की, ती सहा विभागात विभागली गेली होती. त्यावर राजाला मदत करण्यासाठी तीस सदस्यांची महासमिती होती. त्यानंतर सहा सैनिकी विभागांकरता सहा उपसमित्या होत्या. १) नौसेना २) साहित्य ३) पायदळ ४) अश्वसेना ५) रथसेना ६) हत्ती सेना. यावरुन सैनिकी क्षमता दिसून येते. सहा लाख पायदळ, तीन हजार घोडदळ, नऊ हजार हत्ती आणि तेवढेच रथ इतके बलाढ्य सैन्य असताना त्याची सुसंघटीत आणि शिस्तबद्ध रचना केली होती. त्यामुळे शत्रूची वाकडी नजर टाकण्याची हिम्मत होत नव्हती. या सैन्यबळावर व बुध्दिकौशल्यामुळे हे साम्राज्य संपूर्ण जंबुदिपात पसरले होते.

येवढे बलाढ्य साम्राज्य आणि त्याचा सम्राट अशोक एका शिलालेखात म्हणतो (सर्व मुनिसे पजायमा) सर्व मानव माझे संतान आहे. दुसर्‍या एका लेखात म्हणतात जनहिताला मी आपले सर्वश्रेष्ठ कार्य समजतो. यावरच एकच दिसून येत आहे की, सधम्म आणि राजकारण यांचे एकत्रीकरण करून एवढे मोठे साम्राज्य चालवणे जगातील कोणत्याही राजाला सम्राट अशोकाशिवाय जमलेले नाही.

Team_ABCPR

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat