चक्रवर्ती सम्राट अशोक यशोगाथा भाग :१

प्राचीन भारतीय इतिहासातील सर्वात शक्तिशाली आणि लोककल्याणकारी राजा म्हणून सम्राट अशोकाच्या एकूणच कार्यपद्धतीवरुन दिसून येते. बरोबर एक महिन्याच्या अंतरावर या महान चक्रवर्ती सम्राटाचा जन्मदिवस आहे. त्याच्या अलौकिक कार्याला ही लेखमाला पुरेशी ठरणार नाही. या महान सम्राटाचा जन्मदिवस ज्या पद्धतीने साजरा केला गेला पाहिजे त्यापध्दतीने साजरा केला जात नाही. त्यामुळेच त्याच्या कार्यावर म्हणावा तसा प्रकाश पडत नाही. आज प्रत्येक भारतीयाने आपापल्या घरांमध्ये या महान राजाची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करुन कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. सम्राट अशोकाने कोरलेले ऐतिहासिक शिलालेख, शिलाखंड, राजाज्ञा यासारखे किंवा दुसरे अनेक ऐतिहासिक पुरावे उपलब्ध असताना सुध्दा इतिहास तज्ञ या सम्राटाला एकप्रकारे अडगळीत टाकण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन समोर ठेवून त्या महान सम्राटाचा इतिहास समोर घेऊन येत नाहीत ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
अशोकाने भारतीय प्राचीन इतिहासाला सर्वात महत्वाचा वारसा दिला तो म्हणजे साम्राज्यात सर्वत्र कोरलेले शिलालेख. या शिलालेखांमधून आपले विचार प्रकट केलेले आहेत. काळाच्या ओघात बरेचसे शिलालेख नष्ट झालेले आहेत. अजूनही उत्खननात बरेचसे पुरावे उघडकीस येऊ शकतील परंतु त्यासाठी इच्छाशक्ती दाखवावी लागेल.

चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा जन्म इ. स. पूर्व ३०४ तेव्हाच पाटलीपुत्र (बिहार) हे या सम्राटाचे जन्माचे ठिकाण. चंद्रगुप्त मौर्य यांनी पाया घातलेल्या मौर्य साम्राज्याचा दुसरा मौर्य सम्राट बिंदुसार याचा अशोक हा मुलगा. अशोकावदान, दिव्यावदान आणि वंसथ्थपकासिनी या ग्रंथांमधून अशोकाच्या आईसंबधी खात्रीलायक माहिती देणारे पुरावे दिलेले आहेत. त्यापैकी पहिल्या ग्रंथात अशोकाची आई सुभ्रदांगी असे संबोधले आहे. चंपा येथील ब्राम्हणाची मुलगी असा तीचा उल्लेख आहे. राजवाड्यातील कारस्थानामुळे तीला राजापासून दूर रहावे लागले परंतु ती शेवटी राजाकडे जाऊ शकली पुढे तिला मुलगा झाला त्यावेळी ‘मी दुःखमुक्त म्हणजे अशोक आहे ‘ असे ती स्वतःबद्दल उद्देशून म्हणाली. सम्राट अशोकाच संपूर्ण आयुष्य हे अनेक अख्यायिकांनी भरलेले आहे. त्यामुळे त्या अख्यायिकांवरती किंवा कथांवरती जास्त भर न देता साम्राज्यात त्यांनी निर्माण केलेल्या लोककल्याणकारी उपाययोजना, एक राजा ते देवानाम प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट हा अलौकिक प्रवास सर्वांसमोर येण गरजेचे आहे. प्रा. रोमिला थापर म्हणतात भारतीय इतिहासातील ख्रिस्तपूर्व पाच शतकांमध्ये झालेल्या घडामोडी यांच्या उलटसुलट प्रवाहामधून ज्या विशेष कतृत्ववान व्यक्ती उदयाला आल्या त्यांच्यामध्ये सम्राट अशोकाची गणना होते. कलिंग युद्धामध्ये झालेल्या संहारामुळे व त्यातून झालेल्या आपल्या विजयामुळे दारूण दुःखाची झालेली निर्मिती पाहून त्या विजयाविषयी खंत व्यक्त करणारा विजेता, एक संत, साधू आणि सम्राट यांचा संगम, राजकीय विचारवंत, मानवी जीवनाविषयी क्वचितच आढळणारा समंजसपणा दाखवणारा राजा अशा अनेक रुपांमध्ये तो अनेकांना दिसतो.

तरूण अशोकाने आपल्या गुणांनी आपल्या पित्यावर सम्राट बिंदुसारवर छाप पाडली. त्यामुळे या तरूण राजपुत्राची उज्जयनीच्या राज्यपाल पदासारख्या महत्वाच्या पदांवर नेमणूक केली. त्यानंतर काही खास हेतूने त्याला तक्षशिलेला पाठवले होते व तेथील कामगिरी व्यवस्थितरित्या पार पाडली. उच्चपदावरील अधिकार्‍यांच्या जुलमी कारभाराला कंटाळून बिंदुसार राजाच्या कारकिर्दीत तक्षशिलेला एक बंड पुकारले होते. अशोकाला त्याच्या पित्याने ते बंड शांत करण्यासाठी तक्षशिलेला पाठवले अशोकाने प्रजेचा संताप वाढू न देता ते बंड यशस्वीपणे शांत केले. अशोकासारख्या गुण आणि अभिरुची असणार्‍या तरूण राजपुत्राला तक्षशिला हे एक आकर्षक शहर वाटत होते. संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि राजकीय राजधानीचे शहर एवढेच या शहराचे महत्त्व नव्हते तर राजमार्गावरील शहर, बहुरंगी संस्कृती असलेले व्यापारी केंद्र आणि महत्वाचं म्हणजे विद्येच्या अनेक मोठ्या केंद्रांपैकी एक.

काही ग्रंथांमधून असे सांगितले आहे की, बिंदुसारला विविध राण्यांपासून झालेल्या नव्यान्नव मुलांना अशोकाने ठार केले. परंतु ही माहिती काल्पनिक असल्याने मानण्याजोगी नाही. बिंदुसारच्या मृत्युच्या वेळी सिंहासनावर अधिराज्य गाजवण्यासाठी संघर्ष झाला. मोठा मुलगा सुसीमचा राज्याभिषेक करावा असा बिंदुसारचा प्रयत्न होता परंतु तक्षशिलेला झालेला उठाव मोडून काढण्यासाठी सुसीमला आलेले अपयश पुढे तक्षशिलेला अशोकाने केलेली यशस्वी मोहीम यामुळे बिंदुसारचा मुख्यमंत्री राधागुप्त याचा अशोकाला पाठिंबा होता त्यामुळेच अशोकाला स्वतःच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या भावांना बाजूला सारून राज्यकारभार करणे भाग पडले होते. आपले स्थान पक्के झाले अशी खात्री झाल्यानंतर इ. स. पुर्व २६९ अशोकाने आपला अधिकृत राज्याभिषेक केला.

यावरून या सम्राटाच्या भावी प्रभावशाली कारकिर्दीचा वेध घेतला जावू शकतो.

धन्यवाद!

Team_ABCPR

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat