बुध्दवारसा, सध्याचे शिक्षक आणि विद्यार्थी.

शिक्षक हे समाजाचा आरसा असतात. हे वाक्य बर्याचदा ऐकायला किंवा वाचायला मिळत. आणि खरच एक शिक्षक अनेकांचे भविष्य घडवत असतो. एक सुदृढ समाजासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते असही आपण मानतो. कारण बालवयातच ची नितीमुल्ये मुलांच्या मनावरती बिंबवली जातात त्यातून तो एक जबाबदार नागरिक म्हणून भविष्यात घडत असतो. परंतु आजचे शिक्षक आणि एकूणच शिक्षणव्यवस्था ही वेगळ्याच कचाट्यात अडकलेल्या अवस्थेत आहे. एकीकडे पालकांना लुबाडणार्या खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि दुसरीकडे सरकारी शाळांचा घसरलेला शिक्षणाचा दर्जा यामध्ये असलेली तफावत ही शिक्षणव्यवस्थेसाठी नक्कीच घातक आहे. सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांची मात्र यामध्ये ससेहोलपट होताना दिसून येत असल्याने त्यांना घडवणारे शिक्षकांनी निदान सध्याच्या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यापर्यंत सामान्यज्ञान व्यवस्थित पोहोचले पाहिजे. याची काळजी स्वतःहून घेतली तर या सामान्य विद्यार्थ्यांना देशाचा निदान इतिहास, भुगोल तरी व्यवस्थित माहिती होईल.
शोकांतिका अशी आहे की, जर शिक्षकांना नीट सामान्यज्ञान नसेल आणि तंत्रज्ञानाचा वापर करू इच्छित नसेल तर मात्र ज्या विद्यार्थ्यांना तो शिकवत आहे त्यांच भविष्य अधांतरीच असणार आहे.

ठिकाण आहे कुडा बुध्दलेणी दिनांक १२ जानेवारी २०२० या दिवशी #Team_ABCPR ची वेबसाइट ओपनिंग कार्यक्रम होता. पुर्वतयारी सुरू होती. त्याचवेळी जवळपासच्या गावांमधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील मुले आणि सोबत शिक्षकही कुडा बुध्दलेणी येथे भेट देण्यासाठी आले होते. लेणीच्या परिसरात आल्यानंतर शिक्षकांनी मुलांना मोकळीक दिली. मुलही सैरावैरा धावत होती. लेण्यांमध्ये जाऊन उत्सुकतेने न्याहाळत होती. आम्ही लेणीसंवर्धक आहे हे समजल्यानंतर काही महिला शिक्षिकांनी मुलांना लेण्यांबध्दल माहिती देण्याची विनंती केली. लेणीसंवर्धक टीम कडून व्यवस्थित माहिती मिळाल्यानंतर तो ग्रुप पुढे निघून गेला. त्याचवेळी अजून एक शाळेचा ग्रुप तिथे आला सोबत शिक्षक होते. ते शिक्षक मुलांना लेण्यांच्या परिसरात न थांबता पुढे जाण्याचा आदेश देत होते. पुर्वीच्या विद्यार्थ्यांसारखे हे विद्यार्थी सुध्दा हे काय आहे ते समजण्यासाठी उत्सुक होते. पण तो शिक्षक काही केल्या त्यांच ऐकेना. तेव्हा लेणीसंवर्धकांनी विनंती केली, सर निदान मुलांना ही वास्तू काय आहे हे तरी सांगा तेव्हा शिक्षकांनी मुलांसमोर अपमान नको म्हणून “ही वास्तू म्हणजे पुर्वीच्या लोकांनी रहाण्यासाठी बांधलेली घर आहेत.” अस एका वाक्यात ठोकून सांगितले. आता शिक्षकांचा त्यांच्या विद्यार्थ्यांसमोरच अपमान नको म्हणून आम्ही लावलेले लेणी मार्गदर्शक बोर्ड त्या विद्यार्थ्यांना वाचायला सांगितले. तिथेच असलेला लेणीसंवर्धक त्यामध्ये असलेल्या प्रत्येक शब्दाचा सोपा अर्थ विद्यार्थ्यांना सांगत होता.

शिक्षकांची ही भूमिका खरच न पटणारी होती. मनाला चटका लावून जाणारी होती. मुलांची होत असलेली तळमळ पहावत नव्हती. ज्या मुलांना हे शिक्षक शिक्षणाचे महत्त्व सांगत असतात त्यांच्याकडून काही चुकीच वर्णन होत असेल तर त्यांना कोण समजावणार. विद्यार्थ्यांना सामान्यज्ञान सोबतच प्रत्येक गोष्टीच ज्ञान मिळालेच पाहिजे कारण तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनाच जर खऱ्या माहितीपासून शिक्षकच वंचित ठेवत असतील तर मात्र शिक्षक समाजाचा आरसा असतात हे कदापि मान्य होणार नाही. हे एक प्राथमिक उदाहरण आहे. जे निदर्शनास आले यासारखी कित्येक उदाहरणं रोज घडत असतील. विद्यार्थ्यांना ती माहिती देण्यात शिक्षकांना काय हरकत होती हे न कळण्यासारख आहे. त्यात त्या गरीब विद्यार्थ्यांचा काय दोष. एक तर शिक्षणव्यवस्थेने निर्माण केलेली भली मोठी दरी त्यामध्ये भरीस भर असले शिक्षक मग या मुलांनी जायच तरी कुठे. महाराष्ट्रात किंबहुना संपूर्ण देशात शिक्षणाच्या प्रत्येक विषयात हीच अवस्था आहे. काही शिक्षक त्याला नक्कीच अपवाद असतीलही पण शिक्षणव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलली पाहीजेत.

सध्या अनेक प्राचीन बौध्दवास्तू शाळांच्या सहलीसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. परंतु त्याठिकाणी आवश्यक असलेले मार्गदर्शक बोर्ड उपलब्ध नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही योग्य माहितीअभावी वरती नमुद केलेली वेळ येते. पुरातत्व खात्याने विद्यार्थ्यांच्या सोईसाठी तरी निदान मार्गदर्शक बोर्ड लावावेत यासाठी आम्ही सतत पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करत आहोत. ही लढाई फक्त बौध्दवारसा जतन करण्यासाठीच नाही तर ती आता सर्वसमावेशक होईल. यापुढे या प्राचीन वास्तूंकडे बघणारी प्रत्येक नजर बुध्दांच्या समतेची आणि बंधुतेचा आदर करणारी असली पाहिजे. त्यासाठीच हा समृध्द वारसा पुढच्या पिढीपर्यंत कसा जाईल आणि तोही सुरक्षित कसा जाईल यासाठी लेणीसंवर्धन ही चळवळ उभी राहिली आहे.

Team_ABCPR

Jay Bhim Namo Buddhay
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat