● लेणी संवर्धन एक सामाजिक गरज / A social need for conservation of caves●

धम्माच्या विकासाचा रथ हा धम्मअनुयायी लोकांच्या प्रज्ञाशील आणि सम्यक कृतीवर आधारित आहे. अनुयायी जेवढे ज्ञानी, बुद्धिवंत आणि जागरूक असतील धम्म तेवढाच सुरक्षित राहील. आपले धम्म अनुयायी हे १४ एप्रिलच्या दिवशी मोठा समारंभ आणि ६ डिसेंबरला मोठा शोकदिन पाळण्यातच धन्यता मानतात. जेवढी पुस्तके बौद्ध लोक खरेदी करतात तेवढी जागरूक ते आहेत का हा मला पडलेला मोठा प्रश्न आहे. आजच्या परिस्थितीचा विचार करता बौद्धांनी केवळ राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपले झेंडे रोवण्याचे प्रयत्न करताना आपली संस्कृती आणि धम्माच्या ऐतिहासिक वारसा सुद्धा जपण्याचा प्रयत्न करायला हवाच. तो वारसा म्हणजे जागोजागी असलेली बौद्ध लेणी यांची माहिती, अभ्यास आणि देखभाल... अर्थात संवर्धन..!
 लेणी संवर्धन हा आजच्या काळातील खरच एक सामाजिक आणि धार्मिक गरज आहे जी उद्याच्या बौद्ध पिढीला आपल्या धम्माचा वारसा सांगण्यात महत्वाची भूमिका बजावेल. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणा नंतर २५०-३०० वर्षांनंतर सम्राट अशोकाच्या स्वरूपात बौद्ध धम्माला नवी लकाकी मिळाली. बौद्ध धम्म अजून गतीने प्रसारित होवू लागला. मात्र धर्मकंटकांच्या दृष्कृत्याची चाहूल सम्राट अशोकांना नक्कीच होती. त्यांनी बौद्ध धम्म पुढच्या पिढीला कळवा आणि त्यांचे वर्षानुवर्षे जतन व्हावे त्या दृष्टीने राज्यभर (तेव्हाचा अफगाणिस्तान पर्यंतच्या भारत राज्यात) ८४००० लेणी, विहारे आणि स्तूपे निर्माण केली. बौद्ध धम्माच्या संशोधनासाठी भारतात आलेले तीन चिनी प्रवासी फा-हिआन, ह्यु-एन-त्संग आणि इ-त्सिंग यांनी इसवी सन चौथ्या व सातव्या काळात भारतभर भ्रमण करून बौद्ध धम्म व त्याच्या अनेक वारसा यांची माहिती ग्रंथात सुरक्षित केला होता आणि चीन मध्ये त्याचे जतन केले होते.चीनमधून नंतर हाच धम्म पुढे सीरिया, जपान पर्यंत पोहोचला.पुढे नंतरच्या काळात हिंदू आणि मुस्लिम आक्रमणे झाली त्यात बौद्ध धम्मावर साहित्य, तलवार आणि संस्कृती ह्या तिन्ही मार्गावर हल्लाबोल झाला. बौद्ध धम्म नेस्तनाबूत करण्याचा डाव धर्मदरोडेखोरांनी केला. अनेक बौद्ध भिख्खू, उपासक यांच्या कत्तली केल्या गेल्या. अनेक भिख्खूंनी सुरक्षित ठिकाणीं इतर देशांत स्थलांतरे केली. अनेक स्तूप, विहारे आणि बुद्ध मुत्या लयास गेल्या. मात्र विरळ मानववस्ती असलेल्या डोंगरदऱ्यात, घाटात, उभ्या चढणीच्या पाषाणात, उंच ठिकाणी असलेल्या लेण्या, स्तूप सुरक्षित राहिली. नंतरच्या काळात राईट नावाच्या इंग्रज अधिकारी यांना अनपेक्षितपणे अजंठा-वेरूळ लेण्यांचा शोध लागला आणि त्याच बरोबर पुन्हा एकदा बौद्ध धम्म प्रकाशात आला. इंग्रजांनी भारतभर बौद्ध संस्कृती आणि लेण्यांवर संशोधने केली त्यात अनेक ठिकाणी बौद्ध वारसा व त्याच्या खुणा समोर आल्या. त्याचे पुढचे पाऊल म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील बौद्ध धम्माच्या अभ्यासातून बौद्ध लेण्यांची माहिती मिळवली आणि खऱ्या अर्थाने बौद्ध धम्माचे पुनरुत्पादन झाले. १९५६ साली भारतात बौद्ध धम्म नव्याने रुजला. 
 हा सर्व काळ जाताना एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की, निस्वार्थी कार्य आणि बलिदान देवून आमच्या पूर्वजांनी म्हणजे बौद्ध भिक्खुंनी, सम्राट अशोकांना, बौद्ध धम्म अभ्यासकांनी आणि बाबासाहेबांनी जो मौल्यवान असा सद्धम्म आम्हाला अगदी विनामूल्य दिला त्यांचा वारसा जपण्याचे, त्याचे योग्य जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आम्ही सामान्य अनुयायांनी घेतलीच नाही. एकदा सन. २०१६ च्या महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही कोकणातील काही तरुण मंडळींनी एखाद्या ठिकाणी सर्वांनी भेटावे म्हणून बोरिवलीच्या कान्हेरी लेण्यात भेटण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. तिथे महाशिवरात्रीच्या दिवशी हिंदू लोक स्तुपाला शंकराची पिंड समजून पूजा करायचे आणि त्यावर नारळ वगैरे फेकून मारायचे. त्यामुळे तिथे येणाऱ्या आणि असे अंधश्रद्धायुक्त कृत्य करणाऱ्या लोकांमुळे लेण्यांचे, स्तुपांचे बरेच नुकसान झालेले होते. खूप मोठी रांग त्या दिवशी लागायची. हे सर्व होत असताना कोणत्याही बौद्ध संघटनेने अथवा सरकारने देखील ह्या अनुचित प्रकारची दखल घेतली नव्हती. आम्ही मात्र अशा गोष्टीला कायदेशीररित्या थांबायला हवे ह्याच प्रयत्नात होतो. प्रथम आम्ही सर्वांनी पुरातत्व खात्याला या प्रकाराबद्दल सूचना दिली आणि हा प्रकार बंद करावा अशी विनंती केली. पोलीस खात्याला देखील सूचना केल्या गेल्या होत्या. त्यामुळे अगोदरच कडक बंदोबस्त होता. आम्ही विविध भागातून समाज माध्यमातुन जोडलेले सर्व तरुण-तरुणी त्या दिवशी खास सहल करून कान्हेरी लेणी अभ्यासाला तिथे पोहोचलो होतो. पोलिसांनी आपले कर्तव्य खूप चांगल्या पद्धतीने बजावले. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची प्रवेश द्वाराजवळच चौकशी आणि पडताळणी करूनच वर सोडत होते. हिंदू लोक नारळ आणि पूजेचे साहित्य घेऊन आल्याचे आढळताच त्यांना परत पाठवले जायचे. म्हणावे तर खूप मोठी क्रांती होती ही आमच्यासाठी. कारण बौद्ध लेण्यांवर अर्थात बौद्ध संस्कृतीवर होणाऱ्या हिंदू आक्रमणाला आम्ही कुठेतरी थांबण्याचा प्रयत्न केला होता.

ह्याच प्रयत्नातून पूढे लेणी संवर्धन व अभ्यास ही संकल्पना सुचली आणि आम्ही काही तरुणांनी अथक परिश्रमाने ह्या संकल्पनेला मूर्त रूप दिले. त्यात प्रामुख्याने रोहित कदम, अनिल जाधव, रवींद्र सावंत, मुकेश जाधव, प्रज्योत कदम अशी काही सुरुवातीची टीम होती. प्रथम मुंबई जवळील लेण्यांवर भेटी दिल्या, अभ्यास केला. पाली भाषा आणि लेण्यांच्या इतिहासासहित बौद्ध धम्माच्या संस्कृतीचा देखील अभ्यास करण्याचा योग आला. महाराष्ट्रभर अनेक लेण्या अगदी डोंगरात आणि अडचणीच्या ठिकाणी ओस पडल्या आहेत. सरकारसह पुरातत्व खात्याला याची विशेष संवर्धनासाठी गरज वाटत नाही. सरकार तिथेच लक्ष केंद्रित करते जिथे उत्पन्न येत आहे. जसे औरंगाबादच्या अजिंठा वेरूळ लेण्या. इतर ठिकाणी पूर्णतः दुर्लक्ष आहे. महत्वाचे म्हणजे दुर्लक्षित लेण्यांच्या आसपास जे जे बौद्ध लोक आहेत तेही अशा लेण्या पहाव्यात, त्याचे जतन आणि संवर्धन करावे ह्या मताचे आढळत नाहीत. एखादे दुसरे आहेत म्हणा. त्याचे उदाहरण आम्हाला रायगड मधील पाली येथे सुधागड येतील लेण्या अभ्यासताना आला. तिथल्या स्थानिक बरीचशी बौद्ध मंडळी आमच्यासोबत आली होती. त्यानंतर सदर लेण्यांची देखभाल करण्याचा आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन देखील त्यांनी स्वतः हुन दिले. काही लेण्या तर पूर्णपणे आक्रमित झाल्या आहेत. म्हणजे सरळसरळ त्या आपल्या ताब्यातून गेलेल्या आहेत. त्यांचे रूपांतर हिंदू मंदिरात आणि बौद्ध मूर्त्यांचे रूपांतर हिंदू देवात झालेले आहे. अनेक लोक लेण्या पाहायला येताना वेगवेगळ्या उद्देशाने येतात. काही जण उगाच मजामस्ती कारायला, काही शंकराची पिंड समजून (ही हिंदू देवता असलेल्या शंकराचीच पिंड आहे हा त्यांचा पक्का समज असतो) नवस फेडायला, काही तर जोड्याने एकांत मिळावा म्हणून लेण्यांच्याभिक्खू निवासाचा वापर करण्यासाठी येतात, काही नुसते फोटो काढण्यासाठी येतात. काही तर बुद्धमूर्त्यांवर चढून फोटो काढतात. अशा समजावणे म्हणजे त्यांच्या तथाकथित व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला असतो.
लेणी संवर्धन हा विषय काही नवीन नसून सातवाहन काळात निर्मिलेल्या ह्या लेण्यांचे संवर्धन हे त्याचं काळात सुरू झाल्याची माहिती आहे. मात्र आक्रमणकर्त्यांमुळे बौद्ध लोकांची कमी झालेली लोकसंख्या व विहार, लेण्या, स्तूपे ह्यांवर झालेला आक्रमणसदृश्य ताबा ह्यामुळे लेण्यांचे संवर्धन आणि जतन मागे पडले. आम्हाला मात्र लेणी अभ्यासताना असे लक्षात आले की, बौद्ध धम्माची ही संस्कृती अनेक लेण्यांच्या काळ्या पाषाणात पाली भाषेत आणि शिल्परुपात बंदिस्त आहे. जसे की आजची महालक्ष्मी ही मुळातच गौतम बुद्धांची आई माता महामाया असून तिचे तंतोतंत रूप घेऊन नंतर महालक्ष्मी निर्माण केली आहे. याचा जिवंत पुरावा आपल्याला सुधागड लेण्यांच्या शिल्पात कोरलेला दिसतो. असे अनेक शिल्पे आणि शिलालखे बौद्ध लेण्यांवर उपलब्ध आहेत ते सर्वसामान्य बौद्ध इसमाला कळायला हवेत ह्याच संकल्पनेला जोर देत आम्ही सर्वांनी आर्थिक सहभाग देत गावागावात आणि विहारांत जाऊन सदर माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा बेत केला. त्याप्रकारचा प्रतिसाद देखील उत्तम मिळाला आणि आमची टीम अनेक गावागावांत, विहारांत जाऊन आपल्या बौद्ध बांधवांना आपल्या धममविषयी माहिती, संस्कृती विषयी जागरूकता तसेच लेण्यांवरील शिलालेख व स्तूप-बुद्ध मूर्त्यांविषयीचा वारसा आज सांगत आहे.
लेणी संवर्धन व अभ्यास हा विषय अनेकांना श्रमिक आणि वेळ खावू विषय वाटलं तरी आजच्या काळात त्याचे महत्व खूप मोठे आहे. येणाऱ्या पिढीला जर आपला धम्म, बुद्ध, संस्कृती आणि वारसा कळायला हवा तर किमान आपल्या हातात असलेल्या वेळ ह्या संधीचे सोने करून लेण्या व संस्कृती ही जपण्याच्या आपल्याला प्रयत्न करायलाच हवा. कारण आज ज्या गतीने आपल्या धम्मावर, तत्वावर आणि लेण्यांवर हिंदू किंवा इतरांचे जे आक्रमण होत आहे, सरकार व पुरातत्व खाते ज्या प्रमाणे विशेष लक्ष देवू इच्छित नाही, त्याचप्रमाणे आपण बौद्ध असूनही आपल्याच लेण्यांकडे आपण लक्ष देत नाहीत त्यावरून येणाऱ्या काळात लवकरच आपला सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लयाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण आज आपल्याकडे लेण्या माहिती असलेले आणि बौद्धधम्म अभ्यासक अत्यंत विपुल प्रमाणात आहेत. त्यामुळे नुसत्या जयंत्या परिषदा, सभा घेवून धम्म पुढे जाणार नाही तर धम्माची पाळेमुळे ही सर्वांना ज्ञात व्हायला हवेत. त्यांचे संवर्धन आणि जतन व्हायला हवे. आपला धम्म खऱ्या अर्थाने लेण्यांत लपलेला आहे. तो तुम्हाला विहारातल्या चार बंदीस्त भिंतीत सापडणार नाही. हा धम्म जाणून घ्यायचा असल्यास आपल्याला सर्वांना बाहेर पडायला हवे. निसर्गात लपलेला खरा धम्म आणि त्याची तत्त्वे आपल्याला डोंगरदऱ्यातल्या लेण्यांत मिळतील. अनेकांनी सहली, अभ्यासदौरे लेण्यांवर काढायला हवेत. त्यातून अनेक ज्ञानी लोक तयार होतील जे पुढे जावून आपला धम्म योग्यरितीने आपल्या बांधवाना सांगतील, त्याचा प्रचार करतील. त्यातूनच काही लेणी मार्गदर्शन (गाईड) निर्माण होतील व त्यांना उपजीविकेचे साधन निर्माण होईल.
तसे पाहता काही व्यावसायिक गाईड तर पर्यटकांना चुकीची माहिती देतात. आम्ही मात्र तिथे असल्यास आणि असे आढल्यास पर्यटकांना योग्य माहिती देतो ज्यामुळे पर्यटन देखील खुश होतात. हे सर्व झाले आमचे प्रयत्न…. आम्ही चार लोक मिळून सर्व काही लेण्यांचे संवर्धन आणि जतन होणार नाही. आम्ही केवळ सुरुवात केली आहे. हिच सुरुवात कदाचित आपल्या सर्वांच्या सहभागाने क्रांती करेल आणि आपल्या धम्माचा वारसा कोणत्याही अडचणीशिवाय, आक्रमणाला फोडून आपला होवून भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांचे बौद्धमय भारत करण्याचे स्वप्न पूर्ण होईल हीच आशा.
जय भीम

-आयु. स्वप्नील सिद्धार्थ कळंबे
लेणी अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ता-मुंबई

Jay Bhim Namo Buddhay
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat